ई-रिक्षा लवकरच धावणार

मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची माहिती
| कर्जत | प्रतिनिधी |
गेल्या मार्चपासून बंद असलेला ई-रिक्षा प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिली.

मार्च महिन्यापासून बंद असलेल्या ई-रिक्षा नगरपालिकेच्या आवारात उभ्या आहेत. त्यांची दुरूस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच त्या वापरण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ई-रिक्षा माथेरानकरांच्या सेवेत दाखल होतील, असेही मुख्याधिकारी इंगळे यांनी सांगितले. त्यामुळे अनेक दिवस प्रतिक्षा करत असलेल्या ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व शाळेच्या विद्यार्थांची सोय होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ई-रिक्षा सुरू झाल्याने माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होईल, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ई-रिक्षा सुरू करण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेत लवकर रिक्षा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. नगपालिका कर्मचारीदेखील रिक्षा सुरू करण्यासाठी कामाला लागले असून, इतर सर्व बाबी तपासून तसा अहवाल तयार करण्यात गुंतले आहेत. मुख्याधिकारी यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्याधिकारी इंगळे यांचे कौतुक होत आहे.

ई-रिक्षा लवकर सुरू होणार असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांची पायपीट वाचणार असून, मुलांना अभ्यास चांगल्या प्रकारे वेळ मिळेल.

अश्विनी मोरे, पालक, इंदिरा गांधी नगर, माथेरान
Exit mobile version