। माथेरान । वार्ताहर ।
मागील दहा वर्षांपासून ई रिक्षासाठी अविरतपणे लढा देत आज दि.12 मे रोजी सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार माथेरान मध्ये ई रिक्षा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.यामुळे माथेरानचे अर्थचक्र आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे.
माथेरानमध्ये दळणवळणाची सुविधा नसल्याने स्थानिक मंडळी महागाईच्या झळा सोसत खूपच हलाखीचे जीवन जगत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी नगरसेवक सुनील शिंदेंनी मागील दहा वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. ई रिक्षा सुरू करणे हे सर्वात मोठे आव्हान असताना देखील त्यांनी केवळ इथली भौगोलिक परिस्थिती बदलली पाहिजे. माणसाला माणसा सारखी वागणूक मिळाली पाहिजे.वाहतुकीची सोय नसल्याने इच्छा असून सुद्धा वयोवृद्ध पर्यटक येऊ शकत नाहीत याची खंत वाटत असल्यामुळे सुनील शिंदेंनी दहा वर्षे आपला लढा अविरतपणे सुरू ठेवला त्याला यश मिळाले असून लवकरच हे सुंदर स्थळ ई रिक्षाच्या माध्यमातून जगाच्या बरोबरीने धावणार आहे.
खरोखरच ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. कारण इथे स्थानिकांना आजवर अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर ई रिक्षाचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने विविध कार्यालयात जावे लागत होते. सुनील शिंदेंनी जी काही मेहनत घेतली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी असून हे गाव आगामी काळात नक्कीच यशाच्या शिखरावर जाणार यात शंका नाही.
सुरेखा भणगे






