जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 81 मतदान केंद्र
| रायगड | आविष्कार देसाई |
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. तर, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना कपडे वाटत असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली असतानाच आता रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांसाठी जेवणावळी उठत आहेत. तसेच मतांना पाच हजार रुपये देण्यात येत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काही मतदार हे दरवाजात उभे राहून ‘लक्ष्मी’ आपल्या घरी कधी येणार याची वाट बघत असल्याचे चित्र आहे.
शिक्षक/पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराची सांगता झाली. 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. पदवीधर मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवण्यात येत आहेत. याप्रकरणी आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये खरी लढत ही महाविकास आघाडीचे रमेश किर आणि भाजपाचे निरंजन डावखरे यांच्यामध्येच होत आहे. डावखरे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, नंतर त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतल्यानंतर भाजपाकडून निवडून आले होते. आता त्यांनी हॅट्ट्रिक साधण्याची तयारी केली आहे.
डावखरेंना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत भाजपामध्ये मतप्रवाह होता, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हिरवा कंदील दिला. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आली. त्यामुळे त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी चोहोबाजूंनी जोर लावला आहे. रायगड लोकसभा निवडणुकीत धनशक्तीचा जसा विजय झाला, त्याची पुनरावृत्ती करण्याची भाजपाची व्यूहरचना असल्याचे दिसते. या निवडणुकीत मतदारांना ‘लक्ष्मी’चे दर्शन होणार असल्याचे बोलले जाते. ‘लक्ष्मी’ आपल्याकडे येणार असल्याने काही मतदार हे ‘लक्ष्मी’ची वाट पाहात आहेत. ज्यांनी मतांची अधिक नोंदणी केली आहे, तेदेखील मतदारांच्या याद्या हातात घेऊन तोलभाव करण्यासाठी पुढे सरसावल्याची चर्चा आहे. परंतु, त्यांच्यापर्यंत अद्याप कोणीच पोहोचले नसल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे बोलले जाते. काही ठिकाणी तर मतदारांसाठी दारु- मटणाच्या पार्ट्यादेखील पार पडल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीची झेप कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने पदवीधर मतदारांची नोंदणी महाविकास आघाडीने केली आहे. त्यामुळे रमेश किर यांचे पारडे जड असल्याने भाजपाच्या निरंजन डावखरेंसाठी ही निवडणूक तशी सोपी नसल्याचे दिसते. शेवटी मतदारराजा कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि मनसेची पाठ रविवारी अलिबाग येथील होरायझन सभागृहात निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपासह शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि मनसेचे प्रमुख नेते अथवा पदाधिकारी दिसून आले नाहीत. त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरव्याचे दिसून आले. महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकत्र आहेत. अन्य ठिकाणी प्रचारात व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत, अशी सारवासारव भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी केली.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये तब्बल 81 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. पनवेल-27, उरण, कर्जत आणि रोहा प्रत्येकी-6, खालापूर आणि महाड प्रत्येकी -4, अलिबाग-पेण प्रत्येकी-8, माणगाव-3, पाली-सुधागड, मुरुड आणि श्रीवर्धन प्रत्येकी-2, तळा, म्हसळा आणि पोलादपूर प्रत्येकी-1 मतदान केंद्राचा समावेश आहे.
