। पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी हे मार्गदर्शन केंद्र सुरू असणार आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकार्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे हे केंद्र सुरु होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या शिबिरात जवळपास 40 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. याशिवाय या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्ह्यातून अधिक प्रतिसाद मिळाल्यास जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्येदेखील अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असा मानस जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे. पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय पनेवल येथे अर्ज सादर करून या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या वतीने पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी केले आहे.
केंद्राचे उद्घाटन
कर्जत शहरातील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालयामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत: राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकार्यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत गरूड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक बेहेरे, कार्याध्यक्ष पद्माकर गांगल, कार्यवाह सुचिता जोगळेकर, सहकार्यवाह सुधाकर निमकर सदस्य सदानंद जोशी आदी उपस्थित होते. बेहेरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रंथपाल रामदास गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुचिता जोगळेकर यांनी केले. याप्रसंगी मंडल अधिकारी आप्पा राठोड, दहिवली सजाचे तलाठी वैभव आंबोलकर, नरेश महाडिक, संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.