इगल आय ॲप सागरी सुरक्षेसाठी वरदान; रायगड पोलिसांचा अनोखा उपक्रम
| रायगड | प्रमोद जाधव |
सागरी मार्गाने होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी ‘इगल आय ॲप’ नावाचा एक नवा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील बोटींसह मालक, खलाशी व तांडेल यांची माहिती एका क्लिकवर मिळत आहे. सागरी सुरक्षा विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला असून, हा ॲप सागरी सुरक्षेसाठी वरदान ठरत आहे.
रायगड जिल्ह्याला 240 किलो मीटरचा भला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस दलामध्ये सागरी सुरक्षा शाखा ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या सुरक्षा शाखेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सागरी सुरक्षेवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. रायगड पोलीस दलाच्या हद्दीत 28 पोलीस ठाणे आहेत. यापैकी 17 सागरी पोलीस ठाणे आहेत. त्यात खाडीलगतच्या नऊ व सागरी किनाऱ्यालगतच्या आठ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात 130 लँडिग पॉईंट आहेत.
जिल्ह्यातील सागरी सुरक्षा अधिक मजबूत व्हावी, यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतून सागरी कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पोलीस आणि मच्छिमार यांच्यामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, सागरी सुरक्षा अधिक मजबूत व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविला होता. सागरी सुरक्षेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम जिल्ह्यात राबवित असताना, जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांपूर्वी रायगड पोलिसांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला. जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्या बोटींची माहिती मिळावी, त्यात असलेल्या खलाशी व तांडेल यांची माहिती असावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी ‘ईगल आय ॲप’ नावाच्या आधुनिक साधनाचा वापर करण्यात आला.
जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या बोटींची माहिती संगणकाद्वारे घेण्यात आली. बोटीचे मालक, खलाशी, तांडेल यांची माहिती या ॲपमध्ये अपलोड करण्यात आली. प्रत्येक बोटीला ‘ईगल ॲप’ नावाचे बारकोड देण्यात आले. एकूण तीन हजारांहून अधिक बोटींना हे बारकोट पोलिसांमार्फत देण्यात आले आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर बोटीची सर्व माहिती या क्यू आर कोडद्वारे उपलब्ध होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमामुळे ईगल आय ॲप सुरक्षेसाठी वरदान ठरत आहे. एका क्लिकवर सर्व माहिती सुरक्षा शाखेला प्राप्त होत आहे. समुद्रातील गैरप्रकार व सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला रोखण्यासाठी ईगलची मदत होत असल्याचे बोलले जात आहे.
सागरी मार्गाने होणाऱ्या गैरप्रकारासह दहशतवादी हल्ल्याला रोखण्यासाठी ईगल आय ॲप सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील बोटींना क्यू आर कोड देण्यात आला आहे. एका क्लिकवर बोटींची माहिती सहज उपलब्ध होत आहे. सागरी सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी हा ॲप फायदेशीर ठरत आहे.
युवराज म्हसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक
सागरी सुरक्षा शाखा, रायगड पोलीस
रायगड पोलिसांनी सागरी सुरक्षेसाठी एक चांगले पाऊल उचलले. बोटींची माहिती मिळण्यास त्याचा फायदा होत आहे. ईगल आय ॲप फायदेशीर आहे. अनेक बोटींना क्यू आर कोड देण्यात आला आहे.
विजय गिदी,
श्री महालक्ष्मी मच्छिमार सोसायटी राजपुरी, चेअरमन






