भूकंपाने चीन हादरला! 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

वीज, पाणीपुरवठा खंडीत, बचाव कार्याला सुरुवात
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली. या भूकंपात जवळपास 111 नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर 230 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. भूकंपामुळे वीज आणी पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू जिशिशान बओआनच्या काऊंट सीटपासून अंदाजे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गान्सूमधील लिनक्सिया हुई प्रांताच्या डोंग्झियांग आणि साला काऊंटी असलेल्या लिउगौ टाऊनशिपमध्ये होते.

यापूर्वी पाकिस्तानातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता इतकी होती की, या भागातील अनेक इमारती कोसळल्या आहेत.

स्थानिक अग्निशमन आणि बचाव विभागाने 88 अग्निशमन दल, 12 शोध आणि बचाव कुत्रे, 10 हजारांहून अधिक उपकरणांसह 580 बचावकर्ते भूकंप क्षेत्रात तैनात आहेत. भूकंप क्षेत्रातून जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांची सुरक्षा तपासण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. सर्वात जास्त नुकसान काउंटी, डियाओजी आणि किंघाई प्रांतात झाले आहे. येथील अनेक इमारती कोसळल्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात बचाव पथके प्रयत्न करत आहेत. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी पाकिस्तानातही 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मात्र, यात कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर नुसार भूकंप 133 किमी खोलीवर झाला आणि त्याचा केंद्रबिंदू भारतातील जम्मू आणि काश्मीर होता. राजधानी इस्लामाबादसह इतर शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

Exit mobile version