हिंगोली, नांदेड, परभणीसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

। नांदेड । प्रतिनिधी ।

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात शनिवारी (दि.11) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिमसह यवतमाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. तर काही ठिकाणी भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने घरांच्या भितींना तडे गेले असून घरावरील पत्रे हलल्याचीही घटना घडली आहे. अचानक सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी अंदाजे 8 वाजून 46 मिनिटांनी जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळी आठ वाजून 47 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये दरवेळेस भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र यावेळेसचा भूकंपाचा धक्का हा मोठ्या प्रमाणात असल्याचं नागरिक सांगत आहेत. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेक गावांमधील घरामध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडली. तर अनेकांच्या घराला तडे गेल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा भूकंपाचा धक्का हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, परभणी या जिल्ह्यांना सुद्धा जाणवलेला आहे.

नांदेडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. शहरातील सिडको, वजीराबाद, आनंद नगर, तरोडा सांगावी भागात हे धक्के प्रकर्षाने जाणवले आहेत. मिलेल्या माहितीनुसार, 4.7 रिस्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती आहे. वसमत येथील पांगरा शिंदे येथे 10 किमी खोलीवर भुकंपाचे केंद्र असून भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याची माहिती आहे.

वाशिम शहरातील काही भागांबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरात आणि नांदेड शहर व परिसरात हे हलके धक्के बसले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाज आला आणि त्यानंतर जमीन हलल्यासारखे जाणवले.

सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version