पौष्टिक तृणधान्य खा, निरोगी राहा

खालापूर तालुका कृषी अधिकार्‍यांचे आवाहन
| पाताळगंगा | वार्ताहर |
‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आपण राज्यभर मकरसंक्रांत-भोगी हा सण साजरा करतो. इंग्रजी महिन्याच्या सुरुवातीलाच हा सण आल्याने पुढील वर्षभर एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संदेश या माध्यमातून दिला जातो. या सणालाच आता राज्याच्या कृषी विभागाने पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे या सणाची पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणूनही नविन ओळख होणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या कृषि विभागाने जानेवारी महिन्यात साजर्‍या होणार्‍या मकरसंक्रांत-भोगी या सणालाच पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षाचे औचित्य साधत या परंपेराचा आधार घेऊन पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस दरवर्षी राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागान घेतला आहे.

खालापूर तालुक्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त वर्षभरातील विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. जसे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, रोड शो/ रॅली, आरोग्य तपासणी कॅम्प व आहारतज्ज्ञ मार्गदर्शन व्याख्यान, शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजन, पाककला स्पर्धा, जिल्हा परिषद शाळांमध्ये तृणधान्य आहारातील महत्त्व सांगणारे व्हीडिओ दाखविणे इ.चे नियोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत आजपर्यंत शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट, शेतकरी बांधव यांमध्ये पौष्टिक तृणधान्यांविषयीची जनजागृती निर्माण करुन त्यांचा आहारामध्ये विविध पाककृतींदवारे जास्तीत जास्त समावेश करण्यात यावा यासंबंधी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहोत.

Exit mobile version