पदाधिकार्यांची कार्यालयावर धडक
। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
वीज कंपनीचा कारभार तत्काळ सुधारा. लोकांना चांगली सेवा द्या, अन्यथा त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकार्यांकडून देण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे आणखी तीन आठवडे वीज व्यवस्था सुरळीत होण्यासाठी लागणार असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांच्याकडून सांगण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विजेची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी सावंतवाडी येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता साळुंखे यांच्या कार्यालयावर धडक दिली होती. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे मतदारसंघाकडे लक्ष नसल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. तसचे, साळुंखे यांनी महावितरणची भूमिका मांडली. यावेळी रुपेश राऊळ, चंद्रकांत गावडे, चंद्रकांत कासार, प्रकाश गडेकर, यशवंत परब, संजय गवस, भारती कासार, मायकल डिसूजा, उमेश नाईक, संदीप माळकर, आबा सावंत, अजित राऊळ, शब्बीर मणियार, सुनील गावडे, पुरुषोत्तम राऊळ, विनोद काजरेकर, रमाकांत राऊळ, प्रशांत बुगडे, रवींद्र काजरेकर, विलास परब, सचिन मुळीक, श्रुतिका दळवी, कल्पना शिंदे, विनिता घाड़ी, नयनी शेटकर आदी उपस्थित होते. तसेच, सुरक्षेच्या हेतूने महावितरण कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न
महावितरणची संपूर्ण जिल्ह्यात एकूण 53 सेक्शन ऑफिस आहेत. त्या सर्व ऑफिसमधील गावनिहाय आराखडा सुरू आहे. काही ठिकाणी भूमिगत वाहिन्या तर काही ठिकाणच्या विद्युत तारांना कव्हर टाकण्यात येणार आहे. नवीन योजनेत 21 ट्रान्सफॉर्मर घेण्यात आले आहेत. आरडीसी स्कीममध्ये 708 कोटी रुपये मंजूर झाले असून, ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग महावितरणची व्यवस्था चांगल्या प्रकारे होईल. तरी सुध्दा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील वीज व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही अशोक सांळुके यांनी दिली आहे.