अनिल परबांपाठोपाठ भावना गवळींच्या संस्थांवर छापे
। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्यावरुन संतापलेल्या भाजपने आता ईडीच्या सहाय्याने शिवसेनेला जेरीस आणण्याचा चंग बांधला आहे.त्याचाच एक भाग म्हणून रविवारी परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांना मंगळवारी ईडीने कार्यालयात हजर राहण्याचे फर्मान काढले आहे.त्याचबरोबर सोमवारी शिवसेना खा.भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
राणे यांना पुढे करुन भाजपने शिवसेनेवर तीर मारला आहे.राणे यांच्या अटक प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणार्या अनिल परब यांना रविवारी ईडीने नोटीस पाठवून मंगळवारी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर परब यांनी सोमवारी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे.आपल्याला कोणत्या प्रकरणासाठी बोलावले हे माहित नाही.त्यांच्या कार्यालयात गेल्यावरच नेमकी माहिती मिळेल,असे परब यांनी सांगितले आहे.
पाच शिक्षण संस्थांवर कारवाई
यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या 5 शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई छापेमारी केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकार्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वाशिमचा दौरा केला होता. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागी वर्षी 5 कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं.