। म्हसळा । वार्ताहर ।
अवजड वाहनांच्या वाहतुकीला धोकादायक ठरणार्या घोणसे घाटात पनवेलवरून खाद्यतेल घेऊन बोर्ली पंचतन येथे जाणारा ट्रक निवाचीवाडी या परिसरातील तीव्र उतार आणि शिघ्र वळणावर पलटी झाल्याची घटना घडली. ट्रक वळणाच्या रस्त्यावर भरधाव जात असल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.
ट्रक कोपरखैरणे – नवीमुंबई येथील ओम लॉजेस्टीक यांच्या मालकीचा असून, बोर्ली पंचतन येथील कल्पेश एजन्सीचे खाद्य तेल घेऊन जात असल्याचे समजते. दिघी पुणे महामार्गावरील अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या घोणसे घाटातील केळेवाडी या परिसरात तीव्र उतार आणि शिघ्र वळणावर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटण्याच्या या प्रकारामुळे या घाटातील 500 ते 600 मीटरच्या परिसरात शेकडो अपघात झाले आहेत. सदरचे क्षेत्र अपघात प्रवण क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषीत करावे, अशी घोणसे घाट संघर्ष समिती आणि प्रवासी संघटनेचे पदाधिकारी अनिल महामुनकर यांची मागणी आहे. याच ठिकाणी गॅस सिलिंडरचा ट्रक, त्यानंतर काही दिवसात छोट्या प्रवासी वाहनांचेही अपघात झाले होते.