| पाली/बेणसे | प्रतिनिधी ।
पाली सुधागड सह जिल्ह्यात आता भात कापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भातशेतीतून उरलेसुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. अशातच वाढती मजुरी व मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागली आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुण देखील प्रकर्षाने आहेत. शिवाय यावेळी अनेक गंमतीजमती, गाणी, जेवण आदी देखील होते.
नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी आली आहेत. सुशिक्षित तरुणांना शेतीत रस निर्माण झाला असून शेतकामात आता शिकला सवरलेला वर्ग दिसून येत असल्याने कृषी क्षेत्रात हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने आटपून घेत आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्री चा वापर करीत आहेत. यामध्ये श्रम वेळ व पैसा बचत होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी भात झोडणीच्या कामात व्यस्त झाला असून मळणी काढण्यासाठी भल्या पहाटे शेतात दाखल होत आहेत. भात कापणी, भात वाळवणे, पेंढ्याची उडवी रचणे या कामाला आता चांगलाच वेग आला आहे.
खळ्यांवर झोडणी
ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे.
मच्छिवर ताव
अलिबाग येथील तरुण शेतकरी ऍड. राकेश पाटील यांनी सांगितले की शेतीची सर्व कामे करतो. सध्या कापणीच्यावेळी काही शेतात पाणी साठलेले असते, तर अनेक शेत खाडी, नदी, व तळ्याच्या शेजारी आहेत. येथील ताजी मासळी पकडून मस्त कालवण बनवतात आणि सगळेजण यथेच्छ ताव मारतात. यावेळी सुखदुःखाच्या गोष्टी देखील होतात. लोकगीते सुद्धा म्हणतात. शेतीचे काम करत असतांना एकूणच सर्व धम्माल आणि मज्जा असते. असे देखील पाटील म्हणाले.
दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गोरगरीब शेतकर्यांना हे दर परवडणारे नसल्याने घरातील कुटुंबातील व अन्य नातेवाईक कुटुंबांच्या मदतीने आळीपाळीने कापणी व झोडणीची कामे करीत आहेत. या कामात सुशिक्षित तरुण व महिला मोठ्याप्रमाणावर सहभागी होत आहेत. यात समाधान मिळते.
राम तुपे
सुशिक्षित तरुण शेतकरी, कोंडगाव
व्यवसाय सांभाळून सहकुटुंब शेतीची कामे करतो. त्यातून खूप आनंद मिळतो. शिवाय पुढील पिढीला शेतीबद्दल आत्मीयता निर्माण होते. यातून शेती टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतील.
निलेश शिर्के
व्यवसाईक तरुण, पुई, सुधागड