| अलिबाग | प्रतिनिधी |
उन्हाळी सुट्टी संपण्याच्या वाटेवर असून सोमवार दि.16 जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. शाळा प्रवेशोत्सवानिमित्त अलिबाग पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांनी सर्व केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती व विषय शिक्षकांची सभा घेतली. या सभेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी सूनील गवळी यांनी या सभेमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वागताची तयारी बाबत माहिती दिली. त्यानंतर गणवेश, पाठ्यपूस्तके, शूज मध्यान्न भोजन, सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती, अशा अनेक लाभांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याची सुचना केली. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदमय वातावरणात प्रवेश मिळावा त्यासाठी संपूर्ण शाळेला आनंदाचे प्रतीक म्हणजे झेंडूची फुले, आंब्याची पाने यांची तोरणे लावण्यात यावीत, गावात व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, ग्रामस्थ यांना सोबत घेऊन पुस्तक दिंडी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिंडीत सामावून घेणे. विविध रांगोळ्या आणि वर्ग सजावट करून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून प्रवेश द्यावा. विविध गोड पदार्थ विद्यार्थ्यांना देऊन स्वागत करावे, अशा अनेक सुचना सभेमध्ये देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद शाळा या नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतात. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वतःमध्ये प्रबळ आत्मविश्वास भरण्याचे कार्य हे करत असतात. विद्यार्थी शाळेत आला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि शिकला पाहिजे त्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी सूचना देण्यात आल्या. त्यासाठी शिक्षक देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात असा विश्वास देखील संपादन केला. दरम्यान, सुनील गवळी यांची अलिबागचे गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्व केंद्रप्रमुखांच्या वतीने त्यांचे स्वागतही करण्यात आले.






