प्रा. डी.एम.पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
| नागोठणे | प्रतिनिधी |
आपल्या संकुलातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात गेल्या वर्षभरात उल्लेखनीय काम केले आहे. वार्षिक स्नेहसंमेलन हा या सर्व विद्यार्थ्यांचा गौरवाचा दिवस आहे. आपल्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात राबविलेल्या विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांनीही त्यामध्ये चांगली कामगिरी करून आपल्या शाळेचे, शिक्षकांचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले. ईश्वराने प्रत्येकाला कोणती शक्ती दिली असून, त्याची जाणीव ठेवून ती शक्ती आत्मसात करा आणि शिक्षण म्हणजे नीतीमूल्ये, आत्मविश्वास व सर्जनशीलता यांचा सुंदर संगम आहे, असे मार्गदर्शन अग्रवाल विद्यामंदिर व एस.पी. जैन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी.एम. पवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम बुधवारी (दि.26) सकाळी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला संकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत, प्रा.डॉ. संदेश गुरव, अ. जे. जैन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा लोखंडे, वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष भरत भांगरे, उपकार्याध्यक्ष आबेसिंग गावित, सकाळ सत्र प्रमुख नेताजी गायकवाड, दुपार सत्र प्रमुख रमेश जेडगे, निवृत्त चित्रकला शिक्षक भास्कर सोलेगावकर आदींसह शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रांगोळी, चित्रकला व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी आठ वाजता प्र. प्राचार्य डी.एम. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा पार पडल्या. नंतर झालेल्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात पहिली ते 12 वीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याचदरम्यान शाळेच्या ‘आविष्कार’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मेघना म्हात्रे व देवयानी पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे वरिष्ठ लेखनिक संतोष गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.







