| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवी दिल्लीत सोमवारी (दि.8) इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 25 पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, आघाडीची बैठक आता दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाईल. तसेच, या बैठकीत पाच मुद्द्यांवर एकमत झाल्याही माहिती खरगे यांनी दिली असून, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणीवर देखील सर्वांचे एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्लीत सोमवारी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणिस जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यासह देशभरातील 25 पक्षांचे नेते हजर होते. त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही व्हर्च्युअल माध्यमातून बैठकीत सहभाग घेत आपली मते मांडली.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आयोजिक पत्रकार परिषदेत बोलताना खरगे यांनी म्हटले की, पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्व पक्षांमध्ये सहमती झाली आहे. पहिला मुद्दा म्हणजे मतदार यादीतील कथित गैरप्रकार आणि मतांची चोरी याविरोधात सरन्यायाधीशांना पत्र लिहिणे. दुसरा मुद्दा म्हणजे नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करणे. तिसरा मुद्दा देशातील आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा आहे. चौथा मुद्दा म्हणजे इंडिया आघाडीची बैठक दर दोन महिन्यांनी होईल आणि पुढील बैठक दि.8 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे आयोजित केली जाईल. पाचवा मुद्दा संसदेत सर्व विरोधी पक्षांमधील समन्वय कायम ठेवण्याचा आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना मल्लिकार्जून खरगे यांनी, ‘एसआयआर, मतदार यादीतील कथित गैरव्यवहार आणि निवडणुकांमधील गैरप्रकारांविरोधात सरन्यायाधीशांना पत्र पाठवण्यावर एकमत झाले आहे. हे पत्र लवकरच सरन्यायाधीशांकडे सुपूर्द केले जाईल. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यावरही सर्व पक्ष सहमत झाले आहेत. कारण नीट आणि सीबीएसईच्या परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत
