शिक्षणाचा ध्यास घेतलेली ‘ईद्या’; लघुपटाला आठ पुरस्कार, चौदा नामांकने

यशवंतनगर पंचक्रोशीतील कलाकार विजय शेडगेचे यश

| नांदगाव | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील यशवंतनगर पंचक्रोशीतील नांदगाव खारिकवाड्यातील सध्या ‘मणेर’ या डोंगर कुशीतील गावात वास्तव्यास असलेल्या विजय मथुरा पांडुरंग शेडगे या तरुणाने बनवलेल्या ‘ईद्या’ या लघुपटाला आठ पुरस्कार मिळाले असून, त्यास चौदा नामांकने प्राप्त झाल्याने सिनेसृष्टीत या तरुणाने मोठी झेप घेतली आहे.

नाट्य वादळ एंटरटेनमेंट तसेच लेखक, दिग्दर्शक, सिने फोटोग्राफर, टीव्ही सिरियल कलाकार विजय शेडगे यांनीच ‘ईद्या’ची कथा व पटकथा लिहिली असून, दिग्दर्शनदेखील त्यांनीच केले आहे. विद्या ग्रामीण बोली भाषेत ‘ईद्या’ नावाच्या एका ग्रामीण कष्टकरी; परंतु शिक्षणाचा ध्यास असलेल्या एका मुलीची कथा आहे. आई अन्य घरातील धुणीभांडी तथा इतर कष्टाची कामे करून आजारी पडलेली, तर बाप दारुड्या; शिक्षणाने कुणाचेही भले होत नाही, अशी ठाम समजूत असलेला. मुलीला शिक्षणासाठी जवळ दमडी नसताना विद्या आजारी आईच्या बदली धुणीभांडी करून तसेच गवंडी कामावर जाऊन चार पैसे मिळवण्यासाठी राबते व फाटकी पुस्तके चिकटवून रात्री आईच्या उशाला बसून अभ्यास करते. नंतर बापालाही उपरती होऊन तो आपल्याकडील पैसे मुलीला म्हणजेच विद्याला ‘ईद्या’ घेण्यासाठी देताना दारु पिणेही सोडल्याचे सांगतो. याप्रसंगी बापलेकीच्या प्रेमाचा कलाकारांचा उच्च कोटीचा अभिनय बरेच काही सांगून जातो.

ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेला विद्या अर्थात शिक्षण घेण्यात गरीबीचे चटके कसे सहन करावे लागतात; परंतु जिद्द असेल तर त्यावरही मात करून शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या मुलीची भूमिका आदाड या गावातील लिना अजित वाडकर हिने साकारली असून, विद्या या पात्राच्या अभिनयाचे अनेक कंगोरे तिने त्यातून आपल्या सहजसुंदर अभिनयाने उलगडून दाखवले आहेत. बापाची भूमिका नरेश बुवा भेर्ले, तर आईची भूमिका रश्मी शेडगे यांनी सुंदर साकारली आहे. अन्य भूमिका सेजल शेडगे, संतोष शेडगे आदींनी साकारलेल्या असून, लघुपटाचे चित्रिकरण आदाड, मणेर, वडघर-कसाब व अन्य निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागातील असल्याने अस्सल ग्रामीण भागातील अनुभूती त्यातून मिळते व ही कलाकृती आपल्या मनाला भिडते. 27 ऑक्टोबर या आपल्या जन्मदिनी विजय शेडगे यांनी हा लघुपट युट्यूबवर प्रसारित केला आहे.

Exit mobile version