गुंज सामाजिक संस्थेची सामाजिक बांधिलकी
| खरोशी | प्रतिनिधी |
गुंज सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मायनी पेण या शाळेला शैक्षणिक साहित्याचा संच भेट म्हणून देण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाला मोठा हातभार लाभणार आहे.
शाळेमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमास गुंज सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आनंद खरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजनाताई पवार, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या प्रतिनिधींनी गुंज सामाजिक संस्थेचे उद्दिष्ट, विविध सामाजिक उपक्रम आणि शिक्षण क्षेत्रातील कामकाज याविषयी मनोगत व्यक्त केले. सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेले कार्य असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सक्षमतेकडे पाऊल ठरावे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन्स, पेन्सिली, ड्रॉइंग साहित्य, शैक्षणिक चार्ट्स, गणित व विज्ञान शिकवणीसाठी लागणारे साहित्य, खेळण्यांचे साहित्य अशा वर्षभर पुरेल इतक्या शैक्षणिक साहित्याचे संच विद्यार्थ्यांना देण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास मुख्याध्यापक रामकृष्ण भोईर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अमित महागावकर यांनी, तर आभार मंगेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता दिसून येत होती. या उपक्रमामुळे मायणी शाळेला “साहित्यसंपन्न शाळा” हा नवा आत्मविश्वास लाभल्याची भावना शिक्षक व पालकांनी व्यक्त केली.







