तापमानवाढीचा परिणाम मासळीवर

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।

ऑक्टोबर हिटमुळे कासावीस झालेल्या मुरूडकरांच्या समस्येवर अद्याप कोणताही दिलासा मिळेल असे सध्या तरी वाटत नाही.नवरात्रीपासून मुरूड तालुक्यातील वाढलेले तापमान रविवारी दुपारीदेखील 31 सेल्सिअसवर कायम आहे. राज्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख आणि महाराष्ट्र हवामान विभाग यांनी रविवारी दिलेल्या हवामान अंदाजानुसार ओरिसा, बंगालमध्ये आलेल्या ‘दाना’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातदेखील होण्याची दाट शक्यता असून दिवाळीत 31 ऑक्टोबरपर्यंत कधीही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मुरूड तालुका समुद्रकिनारपट्टीतील एकदरा, नांदगाव, बोर्ली, राजपुरी, मुरूड, खामदे या समुद्रात वाढलेल्या तापमानाचा मासळीवर परिणाम झाला असून फक्त कोलंबी मासळी बर्‍यापैकी मिळत असल्याची माहिती नाखवा रोहन निशानदार यांनी दिली. नवरात्रीपासून मासळी मिळत नसल्याने मासेमारी नौका किनार्‍यावर आणण्यात आल्या आहेत. जादा फायदा मिळणारी पापलेट, रावस, सुरमई, बांगडासारखी मोठी मासळी जवळपास मिळत नसल्याने नौका मालक आणि मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत.कधी कधी मासेमारीस गेलेल्या मच्छिमारांचे डिझेलचे पैसेदेखील सुटत नाही, असे नौका मालक रोहन निशानदार यांनी सांगितले. बदलते हवामान, वादळी वारे आणि पर राज्यातील वादळाचादेखील परिणाम होत आहे. यामुळे मासळी सैरभैर होत असून अनेकवेळा स्थलांतर करीत असल्याने समुद्रात हमखास मासळी मिळण्याची ठिकाणे बदलत आहेत. तापमान वाढ कायम असल्याने समुद्राचे पाणी गरम होते. उथळ समुद्रात पाणी अधिक गरम राहत असल्याने मासळी खोल समुद्रातील थंड पाण्याचा आसरा घेत असते अशी माहिती एकदरा गावचे मच्छिमार रोहन निशानदार यांनी दिली.

समुद्रात पाणी अधिक गरम झाल्यास ऑक्सिजन निर्मितीला बाधा येते. माशांना श्‍वास घेण्यास मोठा त्रास होऊन गुदमरल्यासारखे होते.चयापचय क्रिया बिघडते. जीवाच्या आकांताने मासळी अशा प्रसंगात खोल थंड पाण्यात स्थलांतर करीत असते. त्यामुळे परंपरागत मासेमारी करणार्‍या मच्छिमारांना मासळी मिळत नाही. तालुक्यात सकाळी तापमान 25 ते 26 सेल्सिअस असून हिवाळ्याची चाहूल लागली असली तरी दुपारी कडक ऊन पडत असून तापमान 31 ते 32 सेल्सिअसपर्यंत जात कपाळावरून घामाच्या धारा वाहताना दिसून येत आहेत.

 वातावरण बदलाचा थेट परिणाम माशांच्या अधिवासावर दिसू लागला आहे. मोठ्या प्रमाणात मिळणारे जेलीफिश, ट्रीगर फिश आणि पेडव्या, बांगड्यासारख्या माशांचा झालेला प्रवास याचेच संकेत देत आहेत.
पावसाचे वेळापत्रकही कोलमडले आहे.  बर्‍याचदा वातावरणातील याच बदलामुळे मत्स्य हंगामातील दिवस कमी होतात. बदलत्या करंटस्चा परिणाम मच्छिमारांच्या थेट अर्थकारणावर परिणाम करत आहेत.
Exit mobile version