| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागावमध्ये भरवस्तीत आज बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा बिबट्या शिरल्याच्या बातमीने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग, पोलीस यंत्रणा आणि प्राणी मित्र संघटना यांच्या मदतीने गेल्या सात तासांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले नाही. हे रेक्स्यू ऑपरेशन पाहण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.
आज सकाळच्या सुमारास नागावमध्ये बिबट्या शिरल्याचे कळताच नागरिकांमध्ये एकच धावपळ माजली आणि भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी घराची दारे-खिडक्या बंद करुन घरात राहणे सुरक्षित समजले. तर, काहींनी बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी वनविभाग आणि पोलीस यंत्रणेने धाव घेतली आहे. एका घरावर बिबट्या बसल्याचे दिसून आले आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी बंद दाराच्या आडून नागरिक मोठ मोठाले आवाज करीत आहे. वन विभागाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. नागावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्यात आवाहन करण्यात येत आहे. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी जाळी व इतर सामुग्री आणण्यात आली आहे. तसेच त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात येत आहे. मागील सात तासांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. पुण्याहून रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे व बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू
