सूक्ष्म उद्योजकता वाढीसाठी करणार प्रयत्न

बँकांसह तालुका कृषी कार्यालय घेणार पुढाकार
। पोलादपूर । प्रतिनिधी ।

तालुक्यातील विविध प्रकारच्या सूक्ष्म आणि लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्याकामी पुन्हा एकदा व्यापक प्रयत्न सुरू होणार असून राष्ट्रीयकृत बँका आणि तालुका कृषी कार्यालयाच्या पुढाकाराने नजिकच्या काळात सर्व प्रकारचे सूक्ष्म व लघू उद्योग केंद्र सरकारच्या नवीन सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून अधिकाधिक प्रमाणात उभारण्यात येण्याचे ध्येय निश्‍चित करण्यात आले. प्रक्रिया उद्योजक व महिला बचत गटांचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तसेच सामूहिक शेती या विषयावर यावेळी प्रशिक्षण घेण्यात आले.


पोलादपूर शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये सूक्ष्म उद्योजकता वाढीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन राहुल जोशी यांनी नवीन उद्योग व असलेले जुने उद्योग सक्षम करण्यासाठी कर्ज बँकेकडून कसे घेता येईल व त्याला शासन 35 टक्के अनुदान देय आहे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व सामूहिक शेती सामूहिक भाजीपाला लागवड करावी, त्यास मार्केट उपलब्ध आहे. विकेल तिथे पिकेल अंतर्गत आठवडा बाजार पोलादपूर तालुक्यात सुरू आहे, यात शेतकर्‍यांना थेट विक्री केल्यामुळे चांगला दर मिळेल, अशी ग्वाही दिली.


यावेळी व्यासपिठावर रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुमन कुंभार, पं.स.सदस्य यशवंत कासार, प्रगतशील शेतकरी उद्यानपंडीत रामचंद्र कदम, बॅक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विनीत, युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुनील कुमार, कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा सकपाळ, तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, विविध उद्योग करणारे रामदास कळंबे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कपिल पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version