गिधाड या दुर्मिळ पक्षांच्या घरट्यात अंडी

| पाली | वार्ताहर |

माणगाव तालक्यातील पाटणूस गावच्या जंगल परिसरात भारतीय गिधाड किंवा लांब चोचीचे गिधाड या दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या पक्षांच्या घरट्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मादीने अंडी दिलेली आहेत. लवकरच या घरट्यातून गिधाडांची पिल्ले बाहेर डोकावणार आहेत. यामुळे हा परिसर जैवविविधतेने अधिक समृद्ध होईल. पशूपक्षी प्रेमींनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

निसर्ग व पक्षी अभ्यासक शिक्षक राम मुंडे यांनी सांगितले की दोन वर्षांपूर्वी या घरट्यांमध्ये मादीने एक अंडे दिले होते आणि त्यातून एक पिल्लू देखील बाहेर पडले होते. परंतु भुकेमुळे हे पिल्लू दगावले. या वर्षी मात्र दोन वेगवेगळ्या घरट्यात गिधाडांनी आपला संसार थाटला आहे. गेल्या महिन्यात मादीने त्यात अंडी सुद्धा दिलेली आहेत. काही दिवसांत आता या घरट्यातून पिल्लू बाहेर येतील.

निसर्गाचे सफाईगार म्हणून ओळखले जाणारी आणि पर्यावरणातील महत्वाचा घटक असणारी दुर्मिळ अशी भारतीय गिधाडे आता शेवटची घटका मोजत आहेत. मेलेल्या गुरांना अगदी काही तासांच्या आत खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे काम हि गिधाडे करतात. पाटणूस भागात पूर्वी मोठ्या संख्येने या गिधाडांची वस्ती असायची परंतु विळे-भागाड परिसरात एमाआयडीसी आल्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आणि याचा परिणाम स्थानिक लोकांच्या राहणीमानावर झाला. पूर्वी घरोघरी असणारे पशुधन कमी झाले. गुरांचे वाडे नामशेष झाले आणि याचा थेट परिणाम या गिधाडांच्या जीवन क्रियेवर झाला. गिधाडांना पूर्वी सहज मेलेली गुरं खाद्यासाठी मिळत असतं परंतु गेल्या दहा वर्षांपासून सहज मिळणारे हे खाद्य हळू -हळू कमी झाले यामुळे हि गिधाडे स्थलांतरित होऊन निघून गेली. तर डायक्लोफिनॅक औषधे दिलेली मृत गुरे खाल्यामुळे गिधाडांचा मृत्यू होत होता. त्यामुळे देखील गिधाडांची संख्या रोडावली.

गेल्या दहा वर्षांपासून या गिधाडांच्या घरट्यांचा अभ्यास चालू आहे. हवामान बदलाचा या पक्षांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. दोन वर्षांपूर्वी भुकेमुळे एका पिल्लाचा बळी गेला होता. त्यामुळे येत्या काही दिवसात निसर्गप्रेमींकडून देणगीच्या आधारे या गिधाडांसाठी अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

राम मुंडे,
निसर्ग व पशूपक्षी अभ्यासक शिक्षक,
कुंडलिका विद्यालय ,पाटणूस.
Exit mobile version