इजिप्शियन पाहुण्यांना व्हल्चर रेस्टॉरंटची भुरळ

फणसाड अभयारण्यात दर विकेंडला भेट
। मुरूड जंजिरा । प्रतिनिधी ।
सध्या हिवाळ्याला सुरुवात झाल्याने वातावरणातील थंडी हळूहळू वाढत आहे. या गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी तसेच येथील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक देश-विदेशी पर्यटक मुरुडसारख्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसराला हमखास भेट देत आहेत. हे झाले माणसांच्या बाबतीत! परंतु, याच मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड अभयारण्यामध्ये असलेल्या एका खास रेस्टॉरंटची भुरळ परदेशी इजिप्शियन पाहुण्यांना पडली असून, तेथील खाद्याचा आस्वाद घेण्यासाठी हे इजिप्शियन पाहुणे सध्या दर विकेंडला फणसाडमध्ये येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे परदेशी पाहुणे आहेत ‘इजिप्शियन गिधाडे’!

फणसाड अभयारण्यात खास गिधाडांसाठी ‘व्हल्चर रेस्टॉरंट’ तयार करण्यात आले आहे. वनखात्याने पर्यावरणाच्या रक्षणासाठी अत्यावश्यक असलेल्या, परंतु अलीकडे नष्ट होत चाललेल्या या परिसरातील गिधाडांच्या रक्षण तथा संवर्धनासाठी गेल्या वर्षी सुपेगाव परिसरातील ‘व्हल्चर रेस्टॉरंट ’ उभारले आहे. या रेस्टॉरंटमध्ये येथील वनाधिकारी व वनरक्षक मुरुड तालुक्यासह अन्य परिसरातील मृत जनावरांना आणून टाकतात. मेलेल्या म्हशी आदी गायीगुरांचे कुजके, सडके मांस हे गिधाडांचे प्रमुख खाद्यान्न आहे. ते येथे गिधाडांना पुरवले जाते. ते खाण्यासाठी या परिसरातील गिधाडे तर येत आहेतच; परंतु आता त्यात या परदेशी पर्यटकांची भर पडली आहे.

दोन दिवसांपूर्वी वनखात्याने तयार केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये टाकलेल्या एका मृत म्हशीचे मांस भक्षण करण्यासाठी ही इजिप्शियन सोनेरी रंगाची, काळ्या मानेची गिधाडे वनाधिकारी यांना दिसून आली. त्यामुळे दर विकेंडला ती या रेस्टॉरंटला भेट देत असावीत, यावर त्यांचे शिक्कामोर्तब झाले. फणसाड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक नंदकिशोर कुप्ते यांनी त्यास दुजोरा दिला आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे शेती करणे शेतकर्‍यांना परवडत नसल्याने ती बर्‍याच शेतकर्‍यांनी ओसाड टाकली आहे. पर्यायाने शेतीसाठी आवश्यक गुरेढोरांची संख्या कमी झाल्याने गिधाडांचे खाद्यच नामशेष होऊन त्यांच्या संख्येवर परिणाम झाला असून, त्यांचे संरक्षण करणे आवश्यक झाले आहे.

फणसाड अभयारण्यातील वनसंपदा व पशुपक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था मदत करीत असून, ग्रीन वर्क ट्रस्ट ही एक संस्थादेखील गिधाड प्रजातीच्या रक्षण व संवर्धनासाठी येथे काम करीत आहे. त्यामुळे येथे नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या संख्येत वाढ होत आहे. आता तर परदेशी गिधाडे ही फणसाडमध्ये घिरट्या घालू लागली आहेत.

आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांचे फळ मिळत असून, ही बाब आमच्या मनाला आनंद देणारी आहे.

-उमेश परीदा, एन.जी.ओ.
Exit mobile version