चालक आणि वाहक दोघेही सुस्थितीत
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मॅजिक पॉईंट नजिक रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आयशर टँपोला अचानक आग लागली. सदर आगीचे वृत्त समजताच अपघात ग्रस्तांच्या मदतीला या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीची भयानकता इतकी भीषण आहे की खूप खूप दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. खोपोली अग्निशमन, एच पी सी एल अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी हजर होत आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. रसायन असल्याने फोम टँकरला पाचारण करण्यात आले आहे.
काल रात्री बारा वाजताच्या सुमारास गाडी क्रमांक MH 46 BM 0077 भिवंडी येथून कडून हैद्राबाद दिशेने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून जात असताना खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत किलोमीटर बेचाळीसच्या दरम्यान पुणे लेनवर मॅजिक पॉईंट जवळ आल्यावर चालकाला आपल्या वाहनातल्या ड्रमला आग लागल्याचे समजतात चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने जागीच गाडी थांबवून गाडी बाहेर उडी घेतली. क्षणभरात आगीने एवढा मोठा पेट घेतला की, ते वाहन कोणते आहे याचा अंदाजही येत नव्हता. आगीच्या ज्वाळा आजूबाजूला पसरत होत्या त्यामुळे बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेचे पोलीस उप निरीक्षक अनिल शिंदे यांनी दोन्हीकडची वाहतूक थांबवली.
घटनास्थळावरची परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी खोपोली फायर ब्रिगेडची यंत्रणा सुरवातीला पोचल्या नंतर लागलीच आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पाठोपाठ देवदूत यंत्रणा, एमआयडीसी पातळगंगा , उत्तम कंपनी, टाटा स्टील, एचपीसीएल कंपनीच्या फायर ब्रिगेडच्या युनिट त्या ऑपरेशनमधे सहभागी झाल्या. तोवर खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार हे घटनास्थळावर आपल्या कर्मचारी वर्गा सोबत दाखल झाले होते. खोपोली नगरपालिकेचे फायर ऑफिसर हरी सूर्यवंशी यांनी आपला अनुभव पणाला लावून बुमच्या सहाय्याने पाण्याचा मारा केला, त्यांना दर्शन अहिर या पेण नगरपालिका फायर ऑफिसरची मोलाची मदत झाली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळावर सर्व यंत्रणांना सहकार्य करतानाच खालापूरचे तहसीलदार माननीय आयुक्त तांबोळी यांच्या माध्यमातून अग्निशमन यंत्रणांशी संपर्क साधत होते.
जवळपास दोन तासाच्या संयुक्त प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड इत्यादी यंत्रणांनी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान दोन्ही बाजूच्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती ती पूर्वत करण्यासाठी देखील बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा आणि खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी योग्य हाताळणी केली.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक होती ती बाधित होऊ नये यासाठी अत्यंत नियोजनबद्ध असे योगदान देणाऱ्या सर्वच यंत्रणाचे खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कौतुक केले आहे.