खोपटे येथील गौरा उत्सवाची आठ दशकांची परंपरा

| चिरनेर | वार्ताहर |

गणेश उत्सवाच्या काळात गणपतीबरोबरच गौरीचे आगमन होत असून उरण परिसरात पुरुष शंकराच्या रूपात गौरा गणपतीची स्थापना करून गौरीप्रमाणेच नाच गाणी करून गौरा उत्सवही साजरा केला जातो. उरण तालुक्यातील खोपटे पाटील पाडा येथे गौरी आवाहनाच्या दिवशी गौरा म्हणजेच शंकराची प्रतिष्ठापना केली जाते. मागील 81 वर्षापासून ही परंपरा आज ही कायम आहे.

दरवर्षी येथे नियमितपणे सार्वजनिक स्वरूपात गौरव उत्सव साजरा केला जातो. तालुक्यातील सगळ्यात जुने हे गौरा मंडळ असून, या शिवगौराच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील भक्त येत असतात. भाद्रपद शुद्ध अष्टमिला शंकराची प्रतिष्ठापना करून भाद्रपद शुद्ध द्वादशीला सूर्यास्तापूर्वी या गौर्‍याचे विसर्जन केले जाते. या उत्सवात संपूर्ण खोपटे ग्रामस्थ आणि उरण तालुक्यातील सर्व भक्त श्रद्धेने भाग घेतात. 1941 साली खोपटे पाटील पाडा येथील रामजी तुकाराम पाटील, रघुनाथ पोशा पाटील, विश्‍वनाथ नामा पाटील, जनार्धन गोविंद पाटील, रामभाऊ बाळाराम भगत, दादू सावळाराम पाटील, जगन्नाथ हसूराम पाटील आदी अशा 20 जणांनी खोपटे पाटील पाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंडळाची स्थापना केली.

पूर्वी एका जुन्या घरात या शिवगौराची स्थापना करत असत कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा मंडळासाठी दिले, त्यानंतर तिथे ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत देखणे असे शिवमंदिर उभारण्यात आले आणि तेव्हापासून या मंदिरात शिवगौराची प्रतिष्ठापना केली जाते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील आणि सचिव सत्यवान भगत यांनी दिली. गौरी आवाहनाच्या दिवशी सुरू होणार्‍या या गौरा उत्सवात शंकर पार्वती आणि गणेशाची एकत्रित मूर्ती बसविण्यात येते पहिल्या दिवशी महिलांना येथे प्रवेश दिला जात नाही.

यासोबत ऐतिहासिक धार्मिक सामाजिक कथा प्रसंग दाखवून सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जातात पाच दिवस चालणार्‍या गौरा उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन गोंधळ महिलांचे व पुरुषांचे पारंपरिक नाच यासारखे कार्यक्रम सतत असतात या मंडळाचे आणि गौरा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे 81 वर्षापासून येथे पायाला घुंगरू बांधून पारंपारिक बाले नृत्य शक्ती तुर्‍याचे नाच झाल्याशिवाय या उत्सवाची सांगता होत नाही त्यामध्ये कधीही खंड पडला नाही.

Exit mobile version