केदारनाथमधून आठ भाविक हरिद्वारला परतले

खराब हवामानामुळे 120 भाविक अद्यापही अडकलेत

| रायगड | खास प्रतिनिधी |

केदारनाथ खोर्‍यात भूस्खलनाने रस्ते उध्वस्त झाल्याने तेथील दळण-वळणावर परिणाम झाला आहे. तेथे अडकून पडलेल्या नागरिकांसाठी हेलिकॉप्टरने बचाव कार्य सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील 10 पैकी आठ भाविक हे हरिद्वार येथे सुखरूप पोहचले आहेत. गोपाळ पांडुरंग मोरे आणि सुदाम राजाराम मोरे हे केदारनाथ मंदिराजवळील हेलिपॅड येथे अद्यापही अडकले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील सुमारे 120 नागरिकांचा समावेश आहे.

रायगड जिल्हा प्रशासन, मंत्रालय हे केदारनाथ येथील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तेथील वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टरने बचाव कार्य करताना अडचणी येत आहे. केदारनाथ मंदिर अतिशय उंचावर असल्याने हवाईमार्गेच बचाव कार्य करता येते. लवकरच वातावरण सुस्थित झाल्यावर त्यांना तेथून आणण्यात येणार आहे. अडकून पडलेल्यांची खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केली आहे, असे रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

गौरीकुंड ते सोनप्रयागपर्यंतचा रस्ता उद्ध्वस्त झाल्यामुळे पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेलेले हजारो पर्यटक व यात्रेकरु तेथे अडकून पडले आहेत. सुरुवातीला रायगडातील सुमारे 80 यात्रेकरुंचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, रायगड जिल्हा प्रशासाने दिलेल्या माहिती नुसार रायगड जिल्ह्यातील महाड येथून संदीप झानजे यांच्यासह 10 जणांचा ग्रुप केदारनाथ येथे यात्रेसाठी गेले होते. हवामान खराब असल्यामुळे यात्रेकरूंना हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करता येत नाही. सर्व जण सुरक्षित असून टप्या-टप्याने यात्रेकरूंना खाली आणण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला असून आज रात्री पर्यत सर्वांना बाहेर काढण्यात येईल असे कळविले आहे. तथापि आवश्यक वैद्यकीय व इतर मदत करण्याची विनंती केली आहे.

अद्यापही केदारनाथ येथे
गोपाळ पांडुरंग मोरे, सुधाकर राजाराम मोरे (दोघे रा. निगडे, महाड) हे दोघे हेलिपॅड येथे अडकले आहेत.
हरिव्दार येथे सुखरुप आणले
संदिप गोपाळ झांजे-रा. अकले, महाड, सुदाम शिवाजी मोरे, ज्ञानेश्‍वर सयाजी मोरे, राजेश भागुजी मोरे, प्रदिप चंद्रकांत मोरे, संतोष उबरकर, श्रीपत मोरे (सर्व. रा. निगडे, महाड), नितीन सकपाळ (रा. वरंध, महाड) यांना हरिद्वार येथ आणण्यात आले आहे.
Exit mobile version