पेणमध्ये आठ अत्यंत धोकादायक इमारती; मुख्याधिकार्यांकडून गुन्हा दाखल करण्याचे संकेत
पेण | वार्ताहार |
पेण शहरामध्ये आधीच वाढते अतिक्रमण आणि बांधकामा बाबत बेजबाबदारपणा हे गणित जुळलेले असतानाच शहरातील तरे आळी, उत्कर्ष नगर, झिराळ आळी, दामगुडे आळी, भगवान महावीर मार्ग, रामवाडी, कोंबडपाडा आणि शिवाजी पथ या आठ ठिकाणी अत्यंत धोकादायक इमारती असल्याचे पालिकेच्या सर्व्हेनंतर स्पष्ट झाले आहे.
महत्वाचे म्हणजे पेण पालिकेने या इमारत धारकांना महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम 1965 चा कलम 195 नुसार नोटीस देउनही इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इमारत धारकांनी आत्तापर्यत कोणत्याही प्रकारचा दुरूस्तीचा अथवा इमारत पुर्नबांधणीचा पालिकेमध्ये अर्ज केला नसल्याने उघड झाले आहे. तसेच बर्याचशा इमारती खाली केलेल्या नाहीत. या धोकादायक इमारतीमधील काही इमारतीमध्ये आज ही गाळे धारक व मालक आपली दुकान थाटुन बसलेले आहेत. भविष्यात जर काही दुर्घटना घडली तर यामध्ये सर्वस्वी जबाबदारी इमारत मालकांची असणार आहे. तसेच बर्याचशा इमारतींना नगरपालिकेकडून सील केले आहे तर काही इमारती खाली केलेल्या आहेत.
शहरातील इमारती आणि घरे यांचा सर्व्हे करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम 1965 चा कलम 195 नुसार नोटीस पाठविण्यात आले आहेत. तरी सुध्दा त्यांनी नोटीसीला योग्य ती उत्तर दिले नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच या व्यतिरिक्त इतर ज्या धोकादायक इमारती असतील त्यांना दुरूस्ती करण्याचे आणि पालिकेची परवानगी घेउन पक्के बांधकाम करण्यासंदर्भात शहरामध्ये दवंडी पिटविण्यात येणार आहे.
अर्चना दिवे, पेण नपा मुख्याधिकारी.