नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी एडलवाईज ग्रुपच्या संचालकांची आठ तास चौकशी

योग्य कागदपत्र न आणल्याने 11 ऑगस्टला पुन्हा होणार चौकशी

| रायगड | खास प्रतिनिधी |

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकांना आज पोलिसांनी चौकशीला बोलवले होते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्रनाथ काकरला यांच्यासह अन्य तीन जणांचा त्यामध्ये समावेश होता. सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेसहा अशी तब्बल आठ तास पोलीसांनी चौकशी केली.


पोलीसांनी या प्रकरणी महत्वाची कागदपत्रे मागवली होती. पंरतु त्यामध्ये विस्तृत माहिती नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पुन्हा 11 ऑगस्ट रोजी खालापूर पोलीस ठाण्यात योग्य त्या कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.


4 ऑगस्ट 2023 रोजी नितीन देसाई यांनी एनडी स्टुडीओमध्ये आत्महत्या केली होती. इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज कडून त्यांनी 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. वेळेत हप्ते न भरल्याने कर्जाची रक्कमसुमारे 252 कोटी रुपयांवर पोचली होती.


संबंधीत कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थेच्या संचालकांकडून देसाई यांच्यावर सातत्याने रक्कम भरण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. वित्तीय संस्थांच्या जाचाला कंटाळून त्यांनी जीवन संपल्याची तक्रार देसाई यांची पत्नी नेहा यांनी खालापूर पोलीसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करत इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते.


दरम्यान, या प्रकरणाची कागदपत्रे आणण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र पोलिसांनी त्यांना 11 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

Exit mobile version