आठ लाख बांबूची होणार लागवड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात दरडीचा धोका वाढत आहे. गावे, वाड्या दरडीखाली येऊन मोठी वित्तहानी व जिवीतहानी होण्याची भिती निर्माण झाली आहे. दरडी रोखण्यासाठी बांबू लागवडीचा पुढाकार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी घेतला आहे. गावे, वाड्यांजवळ असलेल्या मोकळ्या जागेत आठ लाख बांबूच्या झाडांची लागवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार असून गावांची संख्या 1 हजार 800हून अधिक आहे. जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती असून अनेक गावे, डोंगर टेकडीच्या लगत आहेत. अनेक वाड्या डोंगरावर व पायथ्याशी आहेत. जिल्ह्यात औद्योगिकरण झपाट्याने वाढत असताना नागरिकीकरणदेखील वाढू लागले आहे. त्यामुळे झाडांच्या कत्तलीच्या प्रमाणात वाढ होत आहे. यातच डोंगरच्या डोंगर पोखरली जात आहेत. त्याचा परिणाम पावसाळ्यात बसू लागला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक डोंगरावरील माती, दगड खाली येऊन गावे, वाड्या नष्ट होऊ लागले आहेत. जिवीतहानी, वित्तहानीचे संकट वाढत आहे. जिल्ह्यात दोनशेहून अधिक गावे, दरडीच्या छायेत आहेत. दरड रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. तसेच, दरडग्रस्त गावांतील नागरिकांचे पावसाळ्यात स्थलांतर केले जाते. मात्र, दरडीवर ठोस उपाय नसल्याने दरडीचे संकट कायमच दिसून येत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या आवाहनानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी दरड रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्यांलगत असलेल्या डोंगरावर टेकडी व अन्य मोकळ्या जागेत बांबूची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आठ लाख बांबू लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार ही यंत्रणा कामाला लागली आहे. महाड, पोलादपूरसह अनेक तालुक्यांतील दरडग्रस्त गावांनजीक डोंगरावर बांबूची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 214.89 एकर जागेत बांबूची लागवड करण्यात आली आहे. बांबू लागवडीतून जमीनीची धुप रोखण्यासाठी बांबू लागवड महत्वाची ठरत असल्याने ग्रामपंचायतीमार्फत 8 लाख बांबूची लागवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.
बांबूची मुळे माती धरून ठेवतात. जमीनीची धुप रोखली जाते. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर बांबू लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत 87 हेक्टर क्षेत्रामध्ये 80 हजार बांबूची लागवड केली आहे.
– राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
राजिप ग्रामपंचायत विभाग







