दोन भीषण अपघातात आठ जण जखमी

दीड वर्षाच्या चिमुकलीसह कुटुंब बालंबाल बचावलं

| नागोठणे | वार्ताहर |

मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्यास थांबताना दिसत नाही. तीन दिवसांपूर्वीच नागोठणेजवळील पळस गावाजवळ दोन कारमध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणारा डंपर चालकाच्या चुकीमुळे रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला. तर, निडी गावाजवळ इको कारने स्विफ्ट डिझायर कारला समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला. या दोन्ही अपघातात आठ जण किरकोळ जखमी झाले असून, डंपरच्या अपघातातून दीड वर्षाच्या चिमुकलीसह कुटुंब बालंबाल बचावले आहे. डंपर रस्त्यावरच पलटी झाल्याने सुमारे चार तास वाहतूक कोंडी झाली होती.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. 11 मे रोजी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वडखळ बाजूकडून वाकण बाजूकडे ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणारा डंपर (एमएच06-बीडब्ल्यू-5551) चालक रोहितकुमार ललीत महात्रुरे (30) रा. वायशेत, अलिबाग याचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरच पलटी झाला. मात्र, याचवेळी कोलाड बाजूकडून पेण बाजूकडे आपल्या गावाहून सुतारवाडी (ता.रोहा) येथून ठाणे येथे आपल्या वॅगनार कारने (एचएच-04-जीझेड-8064) जाणारे रामदास काशिनाथ मुंमरे (32) यांची कार दैव बलवत्तर म्हणून या डंपरखाली सापडण्यापासून वाचली असून, एक मोठी दुर्घटना टळली. कारमधील दीड वर्षाच्या दित्या मुंमरे या चिमुकलीसह रामदास मुंमरे, रेवा मुंमरे, अक्षय साळवी हे सर्व बालंबाल बचावले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर नागोठणेपासून वाकण बाजूकडे तसेच वडखळ बाजूकडे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या अपघाताची माहिती मिळताच ऐनघर वाहतूक पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी व नागोठणे सपोनि संजय पोमन व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर सुमारे चार तास या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहतूक पोलीस व नागोठणे पोलीस यांच्या परिश्रमाने क्रेनच्या सहाय्याने डंपर रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दुसऱ्या अपघातात निडी गावाजवळ वडखळ बाजूकडे खराब रस्त्यामुळे चुकीच्या मार्गिकेवरुन जाणाऱ्या इको कारने (एमएच02-डिडब्ल्यू-9227) समोरुन येणाऱ्या कोलाड बाजूकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला (एमएच-01-बीके-8014) जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, स्विफ्ट कारमधील चालक केतन लोखंडे (24), प्रवीण संजय गव्हाणे (32), सुशीला गव्हाणे (24), विश्वास गायकवाड (34) तसेच इको कारमधील पुंडलिक सिताफ (26) रा.रोहा, नंदिनी वल्हार (32), ईश्वरी वल्हार (7), वेदिका वाडेकर (16) सर्व रा. विरार-नालासोपारा हे आठ जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.

Exit mobile version