। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील सव परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात भरधाव स्विफ्ट कारच्या धडकेत आठ वर्षांच्या शरण्या अक्षय दवंडे या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महाड शहर पोलीस ठाण्यात गर्दी करत आरोपी चालकाला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणी केल्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास MH 04 AF 9490 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने सव येथील रहिवासी अक्षय दवंडे यांच्या मुलीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शरण्या हीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक फरहान अब्दुल कादिर ताजीर (रा. अप्पर तुडील) हा घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तत्पर ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
अपघाताची माहिती मिळताच सव परिसरातील ग्रामस्थांनी गुन्हा दाखल करण्यासाठी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. आरोपीला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी आक्रमक मागणी झाल्याने वातावरण अधिक चिघळले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. या कारवाईनंतर परिसरात तणावाचे वातावरण असले तरी परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी दिली. दरम्यान, अपघातप्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत. चिमुकलीच्या अकाली मृत्यूमुळे सव परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.





