। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल येथील पिल्लई कॉलेजजवळ महानगर गॅस कंपनीच्या खोदकामामुळे महावितरण कंपनीच्या जमिनीखालील विज वाहीन्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सेक्टर 15, 15ए व 16 मधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार घडल्यामुळे परिसरातील नागरिक गर्मीने हैराण झाले होते. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
नवीन पनवेलमध्ये विविध सेक्टरमध्ये महानगर गॅसच्या लाईन टाकण्याचे काम जोरदार सुरु आहे. परंतु, त्याचवेळी खोदकाम करताना देखरेखीसाठी पालिकेने आपला कोणताही अधिकारी नेमला का, हा प्रश्न उभा राहत आहे. काही सेक्टरमध्ये पाण्याच्या पाईप लाईन्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या उभी राहिली आहे. तर नुकतेच खोद काम करताना वीज वितरणच्या केबलचे नुकसान झाल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. ऐन उन्हाळ्यात पारा वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. त्यामध्ये वीज प्रवाह खंडित झाल्याने नवीन पनवेलच्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांचे हाल झाले होते. वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने अतोनात काम करून तब्बल अठरा तासांनंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात त्यांना यश आले. याला कारणीभूत कोण? तसेच, प्रशासन खोदकाम करताना रस्त्याच्या खाली किती फूट पाण्याच्या आणि वीज प्रवाहाच्या लाईन आहेत याची माहिती का घेण्यात आली नाही? असा संतप्त प्रश्न नागरिंकामधून होत आहे.







