सुधागडात ‘जलजीवन’ची ऐशीतैशी

अनियमित, अशुद्ध, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
नानोसे ग्रामस्थ, वंचित आघाडीचा आंदोलनाचा इशारा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

ऐन पावसाळ्यात सुधागड तालुक्यातील नानोसे बौद्धवाडीतील ग्रामस्थ महिला भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. शासनाच्या जलजीवन मिशन योजनेची ऐशी की तैशी झाल्याची परिस्थिती आहे. अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने येथील ग्रामस्थ व महिला आक्रमक झाले आहेत. वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका सर्व कार्यकारिणी तसेच महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ नानोसे बौद्धवाडी यांच्या वतीने गावाला शुद्ध, मुबलक व नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी पंचायत समिती पालीचे गटविकास अधिकारी यांना (दि. 2) शुक्रवारी निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर मागणीची पूर्तता न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचा गर्भित इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुधागड तालुकाध्यक्ष अमित गायकवाड, महासचिव आनंद जाधव, युवा अध्यक्ष राहुल गायकवाड, स्वप्नील गायकवाड, रवी लोखंडे, तुषार शिर्के, श्रद्धा शिंदे, आम्रपाली शिंदे, हर्षदा शिंदे, वनिता शिंदे, नीरा शिंदे, वैजनता गायकवाड, रोहिणी गायकवाड, शैला गायकवाड, गौतमी गायकवाड,संगिता गायकवाड, कविता गायकवाड, अनुसया गायकवाड, साक्षी शिंदे, पुष्पा शिंदे आदींसह पदाधिकारी व महिला ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की जलजीवन मिशन या योजनेंतर्गत नानोसे गावाला पाणीपुरवठा होत असून, आजमितीस इथं पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. ग्रुप ग्रामपंचायत परळी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रार केली असतानासुद्धा, मागील एक महिन्यापासून आम्हाला पिण्याचे पाणी मिळाले नाही. वारंवार तक्रारी व पाठपुरावा केल्यानंतर एक महिन्याचा अवधी उलटला तेव्हा कुठं आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, जे पाणी मिळू लागले, ते पाणी गुरेढोरेदेखील पिणार नाहीत असे पाणी आमच्या वाट्याला येत असल्याचा संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

येत्या सात दिवसांत ग्रामपंचायत परळी यांच्याकडून आम्हाला पिण्याचे शुद्ध पाणी व पाण्यासंदर्भातील सर्व सोयी न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका सर्व कार्यकारिणी तसेच महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ नानोसे आपल्या दालनात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

Exit mobile version