तरुणांना लागली प्रबोधन व कीर्तनाची गोडी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
धकाधकीच्या जीवनात मनशांती देणार्या व प्रबोधनाचा मार्ग दाखविणार्या अध्यात्मिक सुखापासून अनेकजण दूर चालले आहेत. माणसापासून आणि माणुसकीपासून फारकत घेतलेल्या समाजाला योग्य मार्ग दाखविण्याची शक्ती कीर्तनात आहे. त्यामुळेच अध्यात्मिक सुखाचा आनंद व आस्वाद मिळावा, समाजमनात अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी व ओढ लागावी याबरोबरच समाज प्रबोधन व्हावे, गावाचा विकास साधावा यासाठी दुरशेत गावात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण एकादशीला हरिकीर्तनाची मालिका चालू करण्यात आली आहे. याला एकादशी कट्टा हे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गावातील तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
या कीर्तन मालिकेचे लोकांकडून विशेष कौतुक होत आहे. पुण्यस्मरण, वाढदिवसनिमित्त लोक कीर्तन सेवा घेत आहेत. तरुणांनी चालू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक म्हणून आजवरच्या कीर्तनकारकांनी कोणतेही अनुदान घेतले नाही. उलट, या उपक्रमाविषयी आदर भाव म्हणून कीर्तनकार स्वतः देणगी देत आहेत. अशा या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पंचक्रोशीत नव्हे तर, पेण तालुक्यात चर्चा होत आहे. किरण हरि फुलारी, चंद्रकांत वामन डंगर, दिनेश नारायण गावंड व रामचंद्र खंडू गावंड आदी तरुणांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या जोडीला गावातील इतर तरुण मंडळीदेखील आहे. आणि समस्त गावकर्यांची त्यांना साथ आहे.
असे सुचले?
लोक समूह एकत्र येण्याचे कीर्तन हेच माध्यम आहे. त्यामुळे कीर्तनच्या या उपक्रमांमधून आपल्याला प्रबोधन साधता येईल या हेतूने गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा नवीन प्रयोग सुरू केला. आणि तो यशस्वीसुद्धा झाला आहे.
विशेष बदल
कीर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. गावातील लोक या हरि कीर्तनाचा आनंद घेत आहेत. त्यामुळे गावात एक प्रकारची चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. कीर्तनाकडे नाक मुरडणार्या तरुणांचा कीर्तनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. विविध क्षेत्रात काम करणारे तरुण शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रसन्न झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक व व्यावसायिक जीवनाचे योग्य व्यवस्थापन होत आहे. कीर्तनासाठी लोक एकत्र येत असल्याने गावातील समस्यांवर चर्चा होऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न होतात. शिवाय, नवीन योजनादेखील आखल्या जातात.
दैनंदिन आयुष्यातील चिंता व ताण या उपक्रमामुळे कमी होऊ लागला आहे. गावातील समस्या सोडविण्यावर येथे चर्चा होते. गावच्या विकासकामांवर बोलले जाते. शिवाय प्रबोधनालादेखील चालना मिळते आहे. त्यामुळे गावात सकारात्मक बदल घडून येत आहे.
समाधान रामा म्हात्रे, दुरशेत






