एमआयडीसी प्रशासनाचा निष्काळजीपणा
| ठाणे | प्रतिनिधी |
डोंबिवलीत अर्धवट विकासकामे आणि खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातच आता नागरी सोयीसुविधांचाही बोजवारा उडाला असून एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये कोसळून एका वृद्धाचा हकनाक मृत्यू झाला आहे. बाबू चव्हाण (60) असे मृताचे नाव आहे.
टाटा पॉवर नाका परिसरातून सोमवारी दुपारी बाबू चव्हाण हे पायी जात होते. अचानक त्यांचा पाय घसरून ते रस्त्यालगत असलेल्या एमआयडीसीच्या पाण्याच्या उघड्या वॉल चेंबरमध्ये पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तातडीने चेंबरमधून बाहेर काढून डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांदरम्यान चव्हाण यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाबू चव्हाण यांची मुले काशिनाथ आणि प्रवीण यांनी एमआयडीसी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप केला आहे.