| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ-सुतारवाडी येथे दारूच्या नशेत चक्क पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केली आहे. प्रभावती रामचंद्र सोरफ (80) असे घटनेतील मृत आईचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मुलगा रवींद्र रामचंद्र सोरफ (45) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र याला दारूचे व्यसन आहे. सोरफ कुटुंबीय वारगांव सोरफ सुतारवाडी येथील एका घरात राहत असून या घरामध्ये पाच बिऱ्हाडे आहेत. बुधवारी (दि.10) रात्रीच्या सुमारास प्रभावती व मुलगा रवींद्र यांच्यात काही कारणावरून वाद झाले. त्यातून संतप्त झालेल्या रवींद्र याने थेट कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि ठिकठिकाणी वार केले. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी कोयत्याचे गंभीर वार करण्यात आले होते. अखेर पोलिसांनी संशयित रवींद्र याला ताब्यात घेतले.






