| मुंबई | प्रतिनिधी |
मिरा रोडच्या लक्ष्मी पार्क देवदर्पण सोसायटीत भीषण घटना घडली आहे. या घटनेत 72 वर्षीय वयोवृद्ध महिला फातिमा युसूफ ज्वाले यांना चोरट्याने तब्बल आठ तास ओलीस ठेवून त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचे सोन्याचे कडे लुटले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने विजतज्ञ असल्याचे भासवत संध्याकाळी 9 वाजता त्यांच्या घरात प्रवेश केला. त्याने दार उघडल्यावर चाकू दाखवत महिलेला बेडरूममध्ये कोंडले. दरम्यान, चोरट्याने त्यांना मारहाण करत त्यांच्याकडून दागिने काढून घेतले. ही सर्व घटना उशिरा लक्ष्यात आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे प्रकरणातील चोरटा रात्रभर घरातच थांबला आणि पहाटे 5 वाजता पळून गेला. घटनेचा उलगडा सकाळी झाला, जेव्हा फातिमा ज्वाले यांच्या पुतणीने त्यांना गंभीर अवस्थेत पाहून पोलिसांना कळवले. सोसायटीत सुरक्षा रक्षक नसल्याने आणि मुख्य गेट बंद असल्यामुळे चोरट्याला घटनास्थळी अधिक वेळ थांबता आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. नातेवाईकांनी सुरक्षेच्या अभावावर नाराजी व्यक्त केली आहे. मिरा रोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.