कशेळे येथील वृद्ध महिलेचे उपोषण तिसर्‍या दिवशी मागे

| नेरळ | वार्ताहार |

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील 75 वर्षीय वृद्ध महिलेने 4 जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. तिसर्‍या दिवशी हे उपोषण स्थगित करण्यात आले असून महसूल विभागाने लेखी आश्‍वासन दिले आहे.

लक्ष्मीचांद गोर यांनी खरेदी करून मोठ्या मुलाच्या नावे केलेल्या जमीनीचा अर्धा हिस्सा आपल्या लहान मुलाला देण्यात यावा. या मागणीसाठी 4 जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. दोन दिवस प्रशासनाच्यावतीने कोणत्याही हालचाली नव्हत्या. मात्र, शनिवारी तिसर्‍या दिवशी तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत हे कशेळे येथे पोहचले. त्यांनी उपोषणकर्ता चंद्रकांता गोर यांचा मुलगा वीरेंद्र यास उपोषण स्थळी बोलावून घेतले. आईला या वयात उपोषण करायला लावू नकोस, यात कदाचित तिचा जीव जाऊ शकतो, असे समजावले. परंतु, मुलगा वीरेंद्र आणि त्याची पत्नी यांनी ग्रामस्थांनी यामध्ये पडू नका असे सांगितले. निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करा त्यानुसार जे होण्यासारखे असेल ते करण्यास मी नक्की मदत करील, असे आश्‍वासन दिले. ग्रामस्थ उदय पाटील यांनी देखील चंद्रकांता गोर यांची समजूत काढून उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

कर्जत पोलिस ठाण्याचे कशेळे आऊट पोस्टचे पोलिस कर्मचारी तसेच माजी सरपंच जयराम हारपुडे, कशेळे मंडल अधिकारी शेट्टे, तलाठी प्रशांत ढाकणे, तलाठी विलास मिरगणे यांच्यासह स्थानिक पूनम पटेल, पांडुरंग भोईर, स्वप्नील हगवणे, सदानंद मते यांनी महत्वाची भूमिका बजावली. सर्वांच्या आग्रहाने शेवटी 75 वर्षीय महिला चंद्रकांता गोर यांनी नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण स्थगित केले.

Exit mobile version