आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे आवाहन

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यातील 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हसळा तालुक्याचा दौरा केला. त्याचे औचित्य साधून जयंत पाटील यांनी म्हसळा येथील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले.

सध्या राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकींच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. रायगड जिल्ह्यात देखील उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. यादरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हसळा तालुक्याला भेट दिली. दरम्यान, पाभरे जिल्हा परिषद गटातील शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष पाटील यांच्या प्रचारार्थ गोंडघर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, स्व. प्रभाकर पाटील यांच्यापासून म्हसळा तालुक्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. स्व. प्रभाकर पाटील यांनी या तालुक्यात अनेक विकासकामे केली असून अनेक गावांच्या पाण्याच्या योजना त्यांनी राबविल्या आहेत. तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामांचा धडाका सुरु असून हा धडाका असाच सुरु राहणार आहे. यापुढेही म्हसळा तालुक्याच्या विकासकामांना निधी कमी पडून देणार नाही, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. शेतकरी कामगार पक्ष सत्तेत नसला तरी तो नेहमी सत्याच्या आणि सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे. गोरगरीब, कष्टकरी, मजूर, शेतकरी यांच्याशी शेकापची वैचारिक व लढाऊ बांधिलकी कायम आहे. त्यानंतर एमआयडीसी संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, आमचा एमआयडीसीला विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांचे समाधान झाले पाहिजे. या अटी मान्य असतील तरच आम्ही जागा देऊ; अन्यथा संघर्ष करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेच, मतदारांनी विरोधकांच्या अमिषाला बळी न पडता महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. या सभेमुळे पाभरे गटासह तालुक्यातील 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीच्या महाविकास आघाडीच्या प्रचाराला चांगलाच जोर आला असून, जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हसळा तालुका दौऱ्याचे औचित्य साधून म्हसळा येथील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष पाटील, रोशन पारवे, पंचायत समितीचे उमेदवार कृष्णा म्हात्रे, चैतन्या गजमल, रमेश खोत व ज्योती गिजे यांच्यासह माजी चिटणीस परशुराम मांदाडकर, राजाराम धुमाळ, राजाराम तिलटकर, दीपल शिर्के, कौस्तुभ करडे, सचिन गिजे, हेमंत नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

विरोधकांवर टीका
सभेत उपस्थितांना संबोधित करताना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी जमिनींच्या खरेदी-विक्रीवरून विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, धनदांडग्यांनी जमिनी घेऊन शासनाच्या मदतीने त्या पाचपटीने विकण्याचा खेळ त्यांनी चालू केला आहे, तो आता चालू देणार नाही. आमचं राजकारण बैलजोडीचं हाय, हळूहळू पण सरळ रस्त्यानं जातं. आणि काहींचं राजकारण उधार बैलासारखं; मालक बदलला की वाट बदलतं! आमच्या नादी लागू नका; नादी लागलात तर गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.
Exit mobile version