सामाजिक बांधिलकी जपणारे प्रतिनिधी निवडा; चित्रलेखा पाटील यांचे आवाहन

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीत निष्ठेला महत्त्व होते. रायगडच्या या पवित्र शिवभूमीतील आमदारांनी केवळ पैशासाठी आपली निष्ठा विकली. याचे महाराजांना निश्‍चितच दुःख होत असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेला खेळ पाहून सर्वसामान्य माणसाला राजकारण्यांचा संताप आल्याशिवाय राहात नाही. पैशाला हपापलेले आमदार पैशासाठी फिरतात, हे दुर्दैवी आहे. त्यांना समाजाची पडलेली नाही. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी निष्ठावान, कर्तव्यदक्ष व सामाजिक बांधिलकी असणारे प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मजगाव येथील कार्यक्रमात केले.

मजगावच्या श्रीशिवप्रेमी शिवभक्त मित्र मंडळाच्या किल्लेबांधणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारे आम्ही असल्याने समाजातील गोरगरीबांना कोणतीही मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कर्तव्य म्हणून आम्ही काम करीत आहोत. समाजसेवेचे बाळकडू आम्हाला जिजाऊ व छत्रपतींकडून मिळाले आहे. मंडळाने तसेच पालकांनी मुलांचे हात मोबाईलपेक्षा गडकिल्ले बनविण्यात गुंतवले हीच मुले आपल्या हातांनी उद्याचा भारत तसेच आपल्या गावाला घडवतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला शेकापचे तालुका चिटणीस अजित कासार, माजी सभापती चंद्रकांत कमाने, भाजपचे तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर, राहिल कडू, जनार्दन काबुकर, तुकाराम पाटील, संतोष जमनु, मनिष नांदगावकर, चंद्रकांत बुल्लु, महेश पाटील, मदन हणमंते, शरद काबुकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पुरोगामी युवा संघटना अलिबाग तालुका प्रमुख विक्रम वार्डे यांचेही भाषण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन मानाजी व आशिष बुल्लु यांनी केले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नाथा भाऊ गिरणेकर यांनी केले. स्पर्धेत मुरुड तालुक्यातील एकूण 126 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील विविध गटातील विजेते पुढीलप्रमाणे गट क्र.1- शिवम चव्हाण -मुरुड-कुंभारवाडा, आर्या भोबू-नांदगाव, वेदांत तळेकर-नांदगाव, गट क्र.2- हिमांशू चव्हाण-मुरुड कुंभारवाडा, विकी काटकर-तळेखार, समिधा कमाने -खारआंबोली. गट क्र.3- अश्‍विन विरकुड, मुरुड, ऋतुजा काटकर-वळके, विवेक म्हात्रे -वळके. उत्तेजनार्थ पारितोषिके- साहिल कांबळे-खारमजगाव, देवश्री गुरव -मुरुड दत्तवाडी, शुभ्रा चौलकर-मुरुड दत्तवाडी, विजय गुंठे -वळके, साजन काटकर-तळेखार, आर्यन काटकर-तळेखार, उर्वशी नाईक- मुरुड कुंभारवाडा, सुहानी साळगावकर-साळाव, कीर्ती गिरणेकर-मजगाव, आयुष कांबळे -खारमजगाव, तन्मय जठारी-मुरुड, ऋग्वेद जोशी-नांदगाव, रोशन शेडगे-शिरगाव यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version