राज्यसभेच्या ‘या’ जागांसाठी निवडणूक जाहिर

महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

निवडणूक आयोगाने 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा सोमवारी केली. यात महाराष्ट्रातील 6 जागांचाही समावेश आहे. येत्या 27 फेब्रुवारीला (मंगळवार) या 56 जागांसाठी मतदान होणार असून, त्याच दिवशी निकाल लागणार आहेत. 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी, अर्ज छाननी 16 फेब्रुवारी तर 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येणार आहेत. 27 फेब्रुवारील सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या ठाकरे गटाचे अनिल देसाई, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला राज्यसभेचं सदस्य आणि खासदार म्हणून पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.

‌‘या' दिग्गजांचा कार्यकाळ संपणार
विशेष म्हणजे देशातील 9 केंद्रीय मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता पूर्ण होत आहे. यामध्ये रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
कुठे किती जागा रिक्त?
उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 10 जागा आहेत. भाजप सत्तेत असलेल्या महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी 6, तर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 5-5 जागा आहेत. कर्नाटक आणि गुजरातच्या प्रत्येकी 4 जागांवर, तेलंगणा, राजस्थान आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 3 जागांवर तर छत्तीसगड, उत्तराखंड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशामध्ये प्रत्येकी एकेका जागेवर मतदान होणार आहे.
Exit mobile version