निवडणूक आयोग अदृश्य शक्तीच्या दबावाखाली

संजय राऊत यांचा आरोप

| सांगली | प्रतिनिधी |

मतदानानंतर तब्बल अकरा दिवसांनी मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये मतदानात 7 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले असून निवडणूक आयोग अदृष्य शक्तीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी सांगलीत केला.

खा. राऊत यांचे सांगलीत आगमन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, मतदान झालेल्या दिवशीच मतदानाची टक्केवारी जाहीर होत असते. मात्र, यावेळी आयोगाकडून पहिल्या टप्प्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी आणि दुसर्‍या टप्प्यातील मतदानानंतर तीन दिवसांनी मतदानाची टक्केवारी जाहीर करताना यामध्ये सहा ते सात टक्के अचानक वाढ झाली आहे. हा प्रकारच धक्कादायक असून नांदेडमध्ये 52 टक्के मतदान झाले होते. त्यात अर्धा किंवा एक टक्का वाढ होऊ शकते. मात्र, आता 62 टक्के कसे होऊ शकते?

वाढीव मतदान कोणाला झाले, असा यामुळे प्रश्‍न निर्माण होत असून आयोगाच्या कामकाजावर विश्‍वास कसा ठेवायचा हा गंभीर विषय आहे. डिजीटल इंडिया असे एकीकडे जाहीर केले जात असताना हा गोंधळ कुणाच्या सांगण्यावरून होतो हे कळायला हवे. मोदी शहा यांच्या दबावाखाली आयोग काम करते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारताचा निवडणूक आयोग भारताचा राहिला नसून तो मोदी शहा यांचे बाहुले ठरला आहे. यामुळे आयोगाने माती खाल्ली आहे हे स्पष्ट होते.

सांगलीमध्ये भाजपचे दोन उमेदवार असून एक काका दुसरा दादा असे सांगून त्यांच्यासाठी भाजपने रसद पुरवठा करावा, असे खा. राऊत यांनी सांगितले. या दोघांच्या प्रचाराला काल योगी सांगलीत आले होते. उद्या भोगी येतील, असेही ते म्हणाले.

Exit mobile version