। उरण । वार्ताहर ।
राज्यातील मच्छीमारांची सर्वात मोठी आणि बलाढ्य संस्था अशी ओळख असलेल्या उरण तालुक्यातील करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 18 डिसेंबरला होणार आहे. या बाबतची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्थेचे शिरिष सकपाळ यांनी दिली.
वार्षिक सुमारे 50 कोटी पेक्षा अधिकची उलाढाल असलेल्या संस्थेचे एकूण 3 हजार 812 मतदार आहेत. 3 हजार 812 मतदारातून 17 संचालकांची गुप्त मतदानाने निवड करण्यात येणार आहे. यामध्ये दोन महिला संचालकांचा समावेश आहे. याआधी 2015 रोजी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. 2020-21 मध्ये संस्थेची मुदत संपुष्टात आली. मात्र कोरोना महामारीमुळे सुमारे दोन वर्ष निवडणूक लांबणीवर पडली होती. आता मात्र मुदत वाढीनंतर येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर तात्काळ त्याच ठिकाणी मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिली.
एकंदरीत करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्याने करंजा गाव परिसरातील कोळी बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण कोळी बांधवांना भेडसावणार्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम हे शासनस्तरावर संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ हे करत असतात. त्यासाठी कुटुंबाचा, विश्वासातील संचालक निवडून येण्यासाठी सध्या मोर्चे बांधणी करण्याची सुरुवात झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.