। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । मतदान यंत्र सिल करताना झालेल्या वादात बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रामपंचायत निवडणूक अधिकार्याला शिवीगाळ करीत आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार मयुरेश गंभीर याने निवडणूक अधिकारी मंगेश पाटील यांना मारहाण केल्याची घटना तहसिलदार कार्यालयाच्या आवारातच तहसिलदार मिनल दळवी यांच्या समक्ष घडली. याप्रकरणी मंगेश पाटील यांच्यावर तक्रार न करण्यासाठी दबाव येत असून संघटनेसोबत चर्चा केल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची लढत टिपेला पोहचली आहे. गुरुवारी तहसिलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सिल करण्याची प्रक्रिया सुरु होती. यावेळी वेश्वी ग्रामपंचायतीच्या मशीन वरिल निवडणूक चिन्हांबाबत उमेदवारांनी आक्षेप घेतला की चिन्ह अस्पष्ट दिसते. त्यानुसार चर्चा झाल्यावर तहसिलदार मिनल दळवी यांनी चिन्ह बदलण्याची सुचना केली. वेश्वी ग्रामपंचायतीच्या निवडणूक पराभव समोर दिसत असल्याने संतूलन बिघडत असल्यानेे अलिबागचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी निवडणूक अधिकारी मंगेश पाटील यांना उद्देशून शिवीगाळ केली. आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्यांना मारण्याचे आदेश देखील दिले. त्यावर मंगेश पाटील यांनी त्यावर आक्षेप घेतला. मात्र तहसिलदार मिनल दळवी यांच्या समोरच आमदारांच्या कार्यकर्त मयुरेश गंभीर याने मंगेश पाटील यांना मारहाण केली.
या प्रकाराने शासकीय अधिकार्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. ही संपूर्ण घटना सदर कार्यालयात असलेल्या सीसीटिव्हीमध्ये चित्रबध्द झाली आहे. त्यामुळे निवडणूकी दरम्यान दहशत निर्माण करणार्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे. दरम्यान, यावेळी शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील प्रकार थांबला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.याप्रकरणी तक्रार करु नये म्हणून मंगेश पाटील यांच्यावर अधिकारी वर्गातून दबाव असल्याचे सांगण्यात आले. मंगेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र आपल्या संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा केल्यानंतर तक्रार करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
दरम्यान महिना दिड महिन्यापूर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना आमदार महेंद्र दळवी यांनी वेश्वी ग्रामपंचायतीच्या असेसमेंटवरुन मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा असा प्रकार घडल्याने दहशतीच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार्या आमदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.