। उरण । वार्ताहर ।
उरण तालुका सहकारी गृहनिर्माण महासंघ यांच्या वतीने उरण तालुक्यातील गृहनिर्माण संस्थेसाठी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम उरण येथे शिवम सोसायटीमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश चौधरी, महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील, सेक्रेटरी वाघ, संचालक धनाजी पाटील, जगदीश पाटील, ऑडिटर दमयंती ठाकूर उपस्थित होत्या.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील प्रास्ताविकात म्हणाले, शासनाच्या राजपत्रित तरतुदी नुसार कोव्हिड काळात 2019 पासून गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत आता शासनाने या निवडणुका घेण्यासाठी मार्च 2022 पर्यंत मुदत दिली आहे. त्या अनुषंगाने या निवडणुका कशा पद्धतीने पार पाडाव्यात यासाठी उरण मधील गृहनिर्माण संस्थासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतलेला आहे. यावेळी त्यांनी महासंघाचे सदस्य होण्यासाठी संस्थांना आवाहन केले. या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतलेल्या संस्था, प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र व निवडणूक पुस्तिका देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी उरण मधील गृहनिर्माण संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.