पाकीटमारी थांबवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची

शरद पवारांचा पुन्हा भाजपाला खोचक टोला


| पुणे | प्रतिनिधी |

भाजप सरकारने शेतकऱ्यांचा शेतीमाल दुध, साखर स्वस्त केले. तर दुसऱ्या बाजुला इंधनाच्या किमती वाढविल्या. शेतकरी पिकवितात ते स्वस्त आणि दुसरे पिकवितात, ते महाग करण्याचे केंद्राने धोरण राबविले. शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकून दुसऱ्या खिशातून दुप्पट पैसे काढून घेतले जातात. ही एक प्रकारची पाकीटमारी आहे. पाकीटमारी बंद करण्यासाठी निर्णय घेणाऱ्याला बाजूला करण्याची गरज असल्याची टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली.

कन्हेरी (ता. बारामती) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, अमित शहा नावाचे गृहस्थ गेल्या दहा वर्षात शरद पवार यांनी काय केल याचा हिशोब मागतात. गेल्या दहा वर्षात सत्ता कोणाची आहे, मंत्री कोण आहे. मी सत्तेत नव्हतो, पण हिशोब मात्र मला मागतात, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लगावला.पवार पुढे म्हणाले, मोदी फडवणीस यांच्यासह अन्य नेते आमच्या विरोधात घटना बदलण्याचा खोटा प्रचार सुरु असल्याचे सांगतात. मात्र, त्यांचेच मंत्री घटना बदलणार असल्याचे सांगतात. घटना बदलण्याचा विचार गंभीर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार महत्वपुर्ण आहे. त्यासाठी सर्वांनी जागरुक राहण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.‌‘लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि हा अधिकार टिकला पाहिजे, या देशाची घटना मोदीसाहेबांना बदलायची आहे असं एक मंत्री म्हणाले ते ही मोदी सरकारमधील आहेत. घटना बदलण्याचा निर्णय कोणी घेत असेल तर गंभीर आहे,’ असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.

Exit mobile version