वीस नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यभरात प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. यामुळे आता या ठिकाणच्या निवडणुका पुढील काही दिवसांनी होणार आहेत. यामध्ये बदलापूर, अंबरनाथ, बारामती यासह आणखी काही शहरातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकांमध्ये अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या दाव्यांवरती उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील साधारण 20 जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामध्ये, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिषदेच्या निवडणुकीतही याचा फटका बसला. तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील सहा प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित झाली आहे. ही निवडणूक आता 20 दिवस लांबणीवर गेली असून पूर्वी 2 डिसेंबरला होणारे मतदान आता 20 डिसेंबरला होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगरपरिषदेचीही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येथील दिग्रस पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. त्याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासह सर्व 25 जागांची निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत. नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील 12 जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी 6 जागांचा यामध्ये समावेश आहे.

Exit mobile version