नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
| पाली | प्रतिनिधी |
पारदर्शक व विश्वासहार्यतेसाठी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात, अशी मागणी सुधागड तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शनिवारी (दि.1) पाली-सुधागड तहसीलदारांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सुधागड वासियांच्यावतीने या अर्जाद्वारे आपल्या मार्फत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास विनम्र पूर्वक विनंती अर्ज करतो की, येणाऱ्या सर्व निवडणुका पारदर्शक व विश्वासाहार्य होण्यासाठी जुन्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. जगातील प्रगत देशात आणि विकसनशील देशात इव्हीएम मशीन वापरली जात नाही. तिथे आजही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. इव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, ही त्यामागची कारणे आहेत. गेली अनेक दशके, अनेक पक्ष, अनेक सामाजिक संघटना इव्हीएमला विरोध करून बॅलेट पेपरची मागणी करत आले आहेत. मताधिकार हा लोकशाहीचा श्वास आहे आणि संविधान लोकशाहीचा आत्मा आहे. तो सुरक्षित राहण्यासाठी या पुढील सर्व निवडणुका पारदर्शक विश्वास दर्शक होण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी महेश पोंगडे, सं.रा. कणघरे, सी.एस. चरण, सुधाकर पवार, निलेश कदम, सुदाम चोरगे, राम दिघे व शरद बोडके आदि नागरिक उपस्थित होते.







