| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावर जसवली तळे परिसरात एक अपघात घडला. हरिहरेश्वर रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक कार यांची जोरदार धडक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक कार श्रीवर्धनच्या दिशेने जात असताना पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक मुख्य रस्त्यावर प्रवेश केला. या ट्रॅक्टरला क्रेन आणि ड्रिल मशीनसारखी अवजड यंत्रणा जोडलेली होती. ही यंत्रणा रस्त्यावर येताच कारला जबर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, कारमधील प्रवासी सुखरूप बचावले, ही दिलासादायक बाब आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे नेण्यात आले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
तथापि, या घटनेची अधिकृत नोंद झाली आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. स्थानिक नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. तसेच, अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर आळा घालण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मोठा अपघात टळला असला तरी निष्काळजीपणा आणि नियमभंग यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.







