टाकाऊ वस्तूंमधून तयार केली इलेक्ट्रिक जीप

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केला विराज टिळक यांचा सत्कार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेट्रोल, डिझेल कारला पर्याय म्हणून इकोफ्रेंडली इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे आले आहे. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील विराज टिळक यांनी 70 टक्के टाकाऊ वस्तूंमधून इलेक्ट्रिक जीप तयार केली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेत शुक्रवारी (दि.10) विराज टिळक यांचा आपल्या दालनात सत्कार केला. यावेळी जिल्ह्यात माझा सत्कार करणारे आपण पाहिले सरकारी अधिकारी असल्याचे स्पष्ट करीत टिळक यांनी आपल्या भवना व्यक्त केल्या.
तळा तालुक्यातील विराज टिळक यांनी 70 टक्के टाकाऊ वस्तूंमधून इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. सध्या इकोफ्रेंडली वाहनांना जास्त पसंती दर्शविण्यात येत आहे. अशाच प्रकारची एक फॅमिली कार आपल्या दारातसुद्धा उभी राहावी हे स्वप्न पाहिले होते. त्यानुसार आपण ही जीप तयारकेली. 70 टक्के टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आलेली ही जीप 4 बॅटरी आणि एका मोटारवर एका चार्जमध्ये 75 ते 80 किलोमीटर धावते. तर पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात. यासाठी 35 रुपये इतका खर्च येतो. ही जीप बनवण्यासाठी एकूण दीड लाख रुपये एवढा खर्च आला असल्याची माहिती विराज टिळक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना दिली. तसेच ही कार बनवण्यासाठी आपल्याला मित्रांनी व इतर सहकार्‍यांनी बहुमोल सहकार्य केले असल्याचेही सांगितले.
डॉ. किरण पाटील यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक जीपचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच यापुढेही आपण असे विविध तंत्रज्ञान विकसित करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत, टिळक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले. प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव उपस्थित होत्या.

Exit mobile version