श्रीवर्धनमधील रस्ते अंधारमय होण्याची शक्यता
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपरिषदेने महावितरणचे जवळजवळ 25 लाख रुपयांचे बिल थकवल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये रानवली येथील जलशुद्धीकरण प्रकल्प त्याचप्रमाणे पाणीपुरवठा विभाग असे मिळून 9 लाख 27 हजार रुपयांची थकबाकी आहे. तर पथदिव्यांची थकबाजी 9 लाख 38 हजार 890 रुपये आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषद कार्यालय कार्यालया व्यतिरिक्त असणारे अनेक अनेक बगीचे, स्वच्छतागृह या ठिकाणचे मिळून एकूण 46 वीज कनेक्शनचे तब्बल 25 लाख रुपये थकबाकी असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.
त्यातच महत्वाची गोष्ट म्हणजे चार महिन्यांपूर्वी सी. एस. आर. फंडामधून सौरऊर्जेचे दिवे श्रीवर्धन शहरांमध्ये समुद्रकिनाऱ्यापर्यंतच्या मार्गावर बसविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या सौरदिव्याच्या दिव्यांना सौरऊर्जा पुरवणारे संच अद्याप पूर्णपणे कार्यान्वित केलेले नाहीत. सध्या हे सौरऊर्जेवरील दिवे महावितरणच्या विजेवरच चालू आहेत. त्यामुळे श्रीवर्धन नगरपरिषदे वरती वीज बिल भरण्याचा अतिरिक्त ताण येत असल्याचे बोलले जात आहे. श्रीवर्धन नगरपरिषद शहरातील नागरिकांकडून नेहमी विविध माध्यमांतून कर जमा करत असते. या करापोटी खूप मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली जाते. परंतु वीज बिल कसे काय थकले? याबाबत नगर परिषदेकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात येत नाही.
दिवसेंदिवस श्रीवर्धन शहरामध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. पर्यटक श्रीवर्धन शहरांमध्ये प्रवेश करताना देखील कर देत असतात. मात्र नगरपरिषदेकडून जर का जनतेला अशा प्रकारे असुविधा देण्याचा प्रकार घडत असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
श्रीवर्धन नगर परिषदेचे थकीत बिल हे पूर्णपणे पथदिव्यांचे नसून अन्य देखील बिल काही प्रमाणामध्ये बाकी असल्याबाबत आपण लवकरच माहिती घेऊ. तसेच, वीज बिल का भरले नाही, याबाबत देखील चौकशी करू. काही तांत्रिक अडचण असल्यास वीज बिलाचा भरणा लवकरच करण्यात येईल.
– विठ्ठल राठोड, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद, श्रीवर्धन
